आयपीडीएस व दीनदयाळ योजनेतील कामे पूर्णत्वाकडे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

आयपीडीएस व दीनदयाळ योजनेतील कामे पूर्णत्वाकडे

शहरी व ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना मिळणार अधिक दर्जेदार सेवा
नागपूर/प्रतिनिधी:राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना दर्जेदार वीज पुरवठा मिळण्याच्या उद्देशातुन महावितरण राबवित असलेल्या एकात्मिक ऊर्जा विकास आणि दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनांची कामे सध्या अंतिम टप्प्यात आहेत. येत्या सप्टेंबर अखेर या दोन्ही योजनांची कामे पूर्ण होणार असून वीज वितरण यंत्रणेच्या सक्षमीकरणात ही विकासकामे महत्वपूर्ण ठरणार आहेत.

ग्राहकांना योग्य दाबाचा व अखंडित वीजपुरवठा व्हावा यासाठी महावितरणकडून वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण आणि आधुनिकीकरणाची कामे सातत्याने केली जातात. केंद्र सरकारच्या सहाय्यातून शहरी व निमशहरी भागांसाठी एकात्मिक ऊर्जा विकास योजना तसेच प्रामुख्याने कृषी व ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना राबविण्यात येत आहेत. 

या दोन्ही योजनांच्या माध्यमातून आतापर्यंत ३३/११ किलोव्होल्टचे ३२० उपकेंद्र कार्यान्वित झाले असून १५० उपकेंद्राच्या क्षमतेत वाढ करण्यात आली आहे. १२२ उपकेंद्रांमध्ये अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आल्याने संबंधित भागाला अधिक दर्जेदार व नियमित वीजपुरवठा मिळण्यास मदत होत आहे. या योजनांतून ८ हजार २५ नवीन वितरण रोहित्र बसविण्यात  आले असून १० हजार ४८० किलोमीटरच्या उच्चदाब व लघुदाब वीजवाहिन्या (उपरी व भूमिगत) उभारण्यात आल्या आहेत. एकात्मिक ऊर्जा विकास योजनेतून ३ हजार ९३ वितरण रोहित्रांची क्षमतावाढ तसेच ५ लाख ७२ हजार ३८ ग्राहकांकडे नवीन मीटर बसविण्यात आले आहेत. दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेतून दारिद्रय रेषेखालील १ लाख ४२ हजार १८० लाभार्थ्यांना नवीन वीज जोडणी देण्यात आली आहे. 

मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस व ऊर्जामंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी या दोन्ही योजनांच्या कामांचा सातत्याने आढावा घेतला. त्यामुळे या योजनांमधील कामे अधिक गतीने पूर्ण झाली आहेत. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प विभागातील अधिकाऱ्यांनी यात महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.