चंद्रपूर जिल्ह्यातील कामगारांसाठी हक्काची घरे बनवणार: मुनगंटीवार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    Create Your Dream Website  

💻 Create a beautiful, modern website

with all the features you need for your industry. 

          News Portals/ Website -   📞 Call- 7264982465      

०७ जुलै २०१९

चंद्रपूर जिल्ह्यातील कामगारांसाठी हक्काची घरे बनवणार: मुनगंटीवार

 चंद्रपूर/प्रतिनिधी:


जो स्वतः घाम गाळून दुसऱ्याचा निवारा तयार करून अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण करतो. तोच निवाऱ्यापासून वंचित राहू नये, यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व कामगारांसाठी घराची निर्मिती करण्यात येणार आहे, असा संकल्प राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केला. सोबतच कामगारांना साहित्याचे वाटप काटेकोर करा, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

  6 जुलै 2019 रोजी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ द्वारा आयोजित अटल विश्वकर्मा सन्मान योजना अंतर्गत बल्लारपूर येथील  बालाजी सभागृहात  आयोजित बांधकाम कामगारांचा मेळावा तसेच विविध योजनांच्या माध्यमातून साहित्य वाटपाच्या सोहळ्यात ते बोलत होते.कष्टकऱ्यांचा घामाचा पैसा कष्टकऱ्यांपर्यंत पोहोचण्याकरिता सरकार कटिबद्ध असून नुकतीच केंद्र शासनाने अर्थसंकल्पात श्रमिकांच्या पेन्शनची योजना घोषित केलेली आहे. शासनाच्या माध्यमातून विविध योजना कामगारांसाठी राबवल्या जात असून शैक्षणिक योजनांमध्ये बांधकाम कामगारांच्या दोन पाल्यांना इयत्ता 1 ली ते 7 वी साठी प्रतिवर्षी अडीच हजार रुपये तर इयत्ता 8 वी ते 10 वी साठी प्रतिवर्षी 5 हजार रुपये एवढे शैक्षणिक आर्थिक सहाय्य,  कामगारांच्या दोन पाल्यांना इयत्ता 10 वी किंवा इयत्ता 12 वी मध्ये किमान 50 टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास 10 हजार रुपये एवढे प्रोत्साहनात्मक शैक्षणिक साहाय्य, कामगारांच्या दोन पाल्यांना अथवा पुरुष कामगारांच्या पत्नीस पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्रवेश पुस्तके व शैक्षणिक सामग्रीसाठी प्रती वर्षी 20 हजार रुपये, सोबतच कामगारांच्या दोन पाल्यांना संगणकाचे ज्ञान मिळवण्यासाठी एमएस-सीआयटीचे प्रशिक्षण घेण्यासाठी शुल्क दिल्या जाते. आरोग्य योजनांमध्ये स्त्री बांधकाम कामगारास तसेच पुरुष बांधकाम कामगाराच्या पत्नीस दोन जीवितापर्यंत नैसर्गिक प्रसुतीसाठी 15 हजार रुपये व शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी 20 हजार रुपये आर्थिक साहायय, लाभार्थी कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना गंभीर आजाराच्या उपचारासाठी 1 लाख रुपये वैद्यकीय सहाय्य, लाभार्थी कामगार अथवा त्यांच्या पत्नीने एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे 18 वर्षांपर्यंत 1 लाख मुदत बंद ठेव, कामगारास 75 टक्के किंवा कायमचे अपंगत्व आल्यास 2 लाख एवढे अर्थसहाय्य, सोबतच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातील नोंदीत बांधकाम कामगारांना महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू करण्यात आलेली आहे. जिल्ह्याच्या व्यसनमुक्ती अभियानात कामगार बांधवही मागे राहू नये याकरिता व्यसनमुक्ती केंद्रामार्फत उपचाराकरिता सहा हजार रुपयांचे  अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

 विशेष आर्थिक सहाय्य योजने अंतर्गत बांधकाम कामगारांचा कामावर असतानाच मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास 5 लाख आर्थिक सहाय्य, कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास 2 लाख आर्थिक सहाय्य, घर खरेदी किंवा घरबांधणी करता बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जावरील 6 लक्ष पर्यंत त्यांच्या व्याजाची रक्कम अथवा 2 लाख रुपये आर्थिक सहाय्य, प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र बांधकाम कामगारांना मंडळामार्फत 2 लाख अनुदान देणे प्रस्तावित आहे.

 सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत बांधकाम कामगाराच्या स्वतःच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या पूर्ततेसाठी 30 हजार रुपये, बांधकाम कामगारांसाठी मध्यान्न भोजन योजना राबवणे, कामगारांच्या पाल्यांना व्यक्तिमत्व विकास पुस्तक संचाचे वाटप, बांधकामासाठी उपयुक्त आवश्यक असलेली अवजारे खरेदी करण्याकरता प्रतिकुटुंब 5 हजार रुपये अर्थसहाय्य, प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, पूर्व शिक्षण ओळख योजना, आयुष्यमान भारत योजना कामगारांना लागू करण्यात आली आहे.

महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये ज्येष्ठ नागरिक, निराधार, विधवा व घटस्फोटिता यांच्या मानधनाच्या अर्थसहाय्य यामध्ये वाढ केली आहे. आतापर्यंत 500 दिव्यांगांना स्वयंचलित तीनचाकी सायकलींचे वाटप करण्यात आलेले आहे. येत्या काही काळात कामगारांसाठी नेत्रचिकित्सा व आरोग्य शिबिर राबवण्यात येणार असून केंद्र शासनाच्या संकल्पनेनुसार 2022 पर्यंत सर्वांच्या घरात गॅस व विज पोहोचवली जाणार आहे. तसेच 2024 पर्यंत प्रत्येकाच्या घरात नळाचे कनेक्शन जोडल्या जाणार आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

या कार्यक्रमात विविध योजनांच्या लाभाचे प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना  चेक व  साहित्य वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे कामगारांसाठी आवश्यक असलेल्या साहित्यांची  किट  कामगारांना प्रदान करण्यात आली. या साहित्य वाटपात कोणताही गैरव्यवहार होणार नाही याची काळजी घ्या, अशी अधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिली.

    यावेळी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश यादव, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिष शर्मा, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सी. श्रीरंगम, चंद्रपूर जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त उज्वल लोया, कामगार कार्यालयाची निरीक्षक एस. कुरेशी, पालकमंत्री इंटर्न सागर कुकुडकर, कामगार कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी तसेच कामगार बांधव हजारोच्या संख्येने उपस्थित होते.