नागपूरकर सावधान;पुढील एक महिना नागपुरात पाणीकपात - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    Create Your Dream Website  

💻 Create a beautiful, modern website

with all the features you need for your industry. 

          News Portals/ Website -   📞 Call- 7264982465      

२२ जुलै २०१९

नागपूरकर सावधान;पुढील एक महिना नागपुरात पाणीकपात

पदाधिकारी-अधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय : मैदान, जलतरण हौद, बांधकामात शुद्ध पाणी वापरणाऱ्यांवर होणार कारवाई
नागपूर/प्रतिनिधी:

नागपूर शहर आणि नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नवेगाव खैरी क्षेत्रात पावसाने दडी मारल्याने नागपूर शहरावर पिण्याच्या पाण्याचे संकट आले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आठवड्यापूर्वी घेण्यात आलेल्या पाणी कपातीच्या निर्णयाला तूर्त एक महिना वाढविण्यात आले आहे. २२ ऑगस्टपर्यंत पाणी कपात कायम राहणार असून आठवड्यातून केवळ चार दिवसच नागपूरकरांना पिण्याचे पाणी मिळणार आहे.


पाणी कपातीचा निर्णय एक आठवड्यासाठी घेण्यात आला. ही मुदत सोमवारी (ता. २२) संपल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीतील मनपा आयुक्त कार्यालय सभागृहात पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलविण्यात आली. बैठकीला उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, उपसभापती भगवान मेंढे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, जलप्रदाय विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, ओसीडब्ल्यूचे सीईओ रॉय, के.एम.पी. सिंग उपस्थित होते.

सदर बैठकीत नागपूर शहरात पाणी कपात करण्यात आल्यानंतर पाणी पुरवठ्यात आलेल्या अडचणी, नागरिकांच्या तक्रारी, दूषित पाण्याची समस्या, नागरिकांची भूमिका आदींची समीक्षा करण्यात आली. प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे आणि जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी मनपा जलप्रदाय विभागाच्या दहाही झोनअंतर्गत कार्य करणाऱ्या डेलिगेटस्‌कडून पाणी पुरवठ्यासंदर्भातील झोननिहाय स्थिती जाणून घेतली. जेथून नागरिकांच्या तक्रारी आल्या तेथे काय उपाययोजना करण्यात आली, याची माहितीही जाणून घेतली.
१२६० दशलक्ष घनमीटर पाण्याची बचत
१५ जुलैला पाणी कपातीचा निर्णय घोषित करण्यात आला. १७ जुलै, १९ जुलै आणि २१ जुलै रोजी शहरातील नागरिकांना पाणी देण्यात आले नाही. केवळ चार दिवस पाणी पुरवठा करण्यात आला. पूर्वी नवेगाव खैरी जलाशयातून सरासरी ५०० दशलक्ष घनमीटर पाण्याची उचल करण्यात येत होती. पाणी कपातीच्या निर्णयानंतर ती सरासरी ३२० दशलक्ष घनमीटर झाली. अर्थात दर दिवशी १८० दशलक्ष घनमीटर पाण्याची उचल कमी करण्यात आली. यानुसार सात दिवसात १२६० दशलक्ष घनमीटर पाण्याची बचत करण्यात आल्याची माहिती जलप्रदाय विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी यांनी दिली.
एक महिन्यासाठी पाणी कपातीचा निर्णय कायम
लांबलेला पाऊस आणि पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयातील पाण्याची स्थिती लक्षात घेता २२ जुलैपासून २२ ऑगस्टपर्यंत आठवड्यातून केवळ चार दिवस पाणी पुरवठा करण्यात येईल. बुधवार, शुक्रवार आणि रविवार पाणी पुरवठा होणार नाही, असा निर्णय प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे आणि जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी घेतला. दरम्यानच्या काळात जलाशय परिसरात जर चांगला पाऊस झाला आणि पाण्याची पातळी वाढली तर ह्या निर्णयावर पुनर्विचार करण्यात येईल, अशी माहितीही यावेळी त्यांनी दिली.

 जलतरण हौद, मैदानावर पाणी वापरण्यास बंदी
शहरातील सर्व जलतरण हौद, मैदान आणि सुरू असलेल्या बांधकामात पिण्याचे पाणी वापरण्यावर बंदी घालण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. संबंधित ठिकाणी संबंधित संस्थेने, मालकाने त्यांनी निर्माण केलेल्या स्त्रोतातून पाणी वापरण्यास मनपाची हरकत नाही. मात्र, शहराला जे पाणी पिण्यासाठी पुरविण्यात येते ते पाणी वापरताना आढळले तर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा यावेळी सभापती पिंटू झलके यांनी दिला.
सर्व सरकारी कार्यालयांना पत्र
नागपूर शहरात असलेल्या विविध सरकारी कार्यालयात, शासकीय संस्थांमध्ये मनपातर्फे पाणी पुरविण्यात येते. मात्र अनेक ठिकाणी पाण्याचे लिकेजेस आहेत. अशा संस्थांना, कार्यालयांना मनपातर्फे पत्र देऊन तेथील पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप, नळाची दुरुस्ती तातडीने करण्याची विनंती करण्यात आली आहे. शहरातील शैक्षणिक संस्था, मंगल कार्यालये, हॉटेल्स, हॉस्पीटल्स आदी ठिकाणचे पाईप, नळसुद्धा तपासण्याचे निर्देश यावेळी प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे आणि सभापती पिंटू झलके यांनी दिले.

बैठकीतील निर्देश आणि महत्त्वाचे निर्णय
शहरातील सर्व मंगल कार्यालय, मोठ्या संस्था, हॉटेल्स, हॉस्पीटल्स यांचे कनेक्शन चेक करण्याचे निर्देश
  अवैधरीत्या टुल्लु पंप वापऱणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश
  जलतरण तलाव, मैदान आणि बांधकामात पिण्याचे पाणी वापरण्यावर बंदी
  तसे आढळल्यास फौजदारी कारवाई
  पाणी पुरवठा ज्या दिवशी बंद राहील त्या दिवशी नॉन-नेटवर्क एरियामध्ये टँकर मिळणार नाही
   अवैध कनेक्शन कापण्याचे निर्देश